
चिपळुणात डंपरखाली चिरडून तरुणी ठार
चिपळूण येथील बहाद्दूर शेख नाक्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या दुचाकीला डंपरची धडक बसली. या धडकेत ही तरुणी दुचाकीवरून पडली आणि डंपरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. श्रुती संतोष शिर्के (वय 17, मूळ राहणार भोम) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघाताची ही घटना मंगळवारी 15 रोजी दुपारी 3:30 वा. दरम्यान घडली. संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी एकनाथ जाधव (राहणार- दळवटणे) ही दुचाकी चालवत जात होती. तिच्या दुचाकीवर पाठीमागे श्रुती शिर्के बसली होती. दोघीही बहादूरशेख चौकाकडे जात असताना डंपरने मागून धडक दिली. यावेळी श्रुती दुचाकीवरून खाली कोसळली आणि डंपरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
जखमी जान्हवी जाधव हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.