
अखिल मराठा फेडरेशनच्या महासंमेलनाला रत्नागिरी उत्साहात सुरुवात,महाराष्ट्रातील ७५ मराठा मंडळे महासंमेलनात सहभागी
रत्नागिरी : अखिल मराठा फेडरेशनच्या महासंमेलनाला रत्नागिरी उत्साहात सुरुवात झाली अखिल मराठा फेडरेशनचे सुरेश सुर्वे म्हणाले की, अप्पासाहेब पवार यांनी तिसरे संमेलन रत्नागिरीत घ्यायचे ठरवले. त्यांनी रत्नागिरीत मराठा मंडळ, व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. पण आज महासंमेलनाला देशातील सर्व मराठा मंडळांचे प्रतिनिधी आले आहेत. मंडळाच्या कार्यात तरुण, तरुणींनी यायला हवे. स्पर्धा परीक्षा, संरक्षण खात्यातही परीक्षा देऊन पुढे गेले पाहिजे. याकरिता मुंबईत मराठा भवन उभारणी करण्यात येणार आहे. आपण नोकरी देणारे झालो पाहिजे.

आपण सर्वांनी कोणाच्या विरोधात नव्हे तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येऊया. येथील हॉटेल विवेक येथे अखिल मराठा फेडरेशनच्या महासंमेलनात ते बोलत होते.महाराष्ट्रातील ७५ मराठा मंडळे महासंमेलनात सहभागी झाली आहेत. हे संमेलन शनिवार व रविवारी होणार आहे. संमेलनात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार, अखिल मराठा समाजभूषण पुरस्कार अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांना सन्मानित करण्यात आले.

अॅडव्हान्स इंजिनिअरिंग तज्ज्ञ उमेश भुजबळराव यांना अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.मराठा समाजाने इतरांना देणारे व्हावे, इतिहासाप्रमाणे राज्यकर्ते राहावे. कारण नोकऱ्या संपत आल्या आहेत. शेतीची अवस्था आपण पाहतोय. मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे उद्योगाकडे वळावे. शेती पूरक उद्योगही करता येतील. त्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन अणुशास्त्रज्ञ आणि बांधकाम व्यावसायिक डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केले. त्यांना अखिल मराठा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सत्कारानंतर बोलताना इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले की, आज देशातील मराठा समाज एकत्र आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा मराठा महिलांनाही सन्मान, पुरस्कार दिला पाहिजे. किमान ५० टक्के महिलांना प्राधान्य द्यावे.मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर विरेंद्र पवार यांनी सांगितले की, अप्पासाहेब पवार १९७१ मध्ये जि. प. सदस्य म्हणून विजयी झाले. त्यानंतर मराठा समाजासाठी त्यांनी अखेरपर्यंत योगदान दिले.
रत्नागिरीत झालेल्या प्रचंड गर्दीने हे महासंमेलनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, याबद्दल पवार कुटुंबियांना अभिमान वाटतोय. आजच्या उपस्थितीने अप्पासाहेबांना खरी आदरांजली वाहिली आहे.मंचावर सेवानिवृत्त मुख्य आयकर अधिकारी अरुण पवार, विविध मंडळांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते. यात दिलीप जगताप, सुनिलदत्त देसाई, संतोष घाग, वीरेंद्र पवार, सुरेश कदम, राजेंद्र सावंत, राजेंद्र साळवी, दीपक परब, दिलीप चव्हाण, सुहास फळदेसाई, सुनील राजेशिर्के, राकेश नलावडे, अमिष बने, जितेंद्र पवार, सुभाष राणे, विजय कदम, सहदेव सावंत, सुनील नलावडे, उर्मिला घोसाळकर, मिलिंद सावंतदेसाई, विजय लाड, सुरेश शिंदे, प्रकाश विचारे, संजय कदम अॅड. अभिजित सावंत राजेंद्र तावडे आदी उपस्थित होते.बातमी क्र. २*द ग्रेट मराठा पुरस्कार खासदार नारायण राणे यांना प्रदान
अखिल मराठा फेडरेशनतर्फे अखिल मराठा महासंमेलनात आज माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांना फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्या हस्ते द ग्रेट मराठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि छत्रपतींची प्रतिमा व दोन तलवारी असणारी काचेची फ्रेम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.द ग्रेट मराठा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात येणार होता, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नवनियुक्त आमदारांचाही सन्मान होणार होता. परंतु तेही येऊ शकले नाहीत. खासदार व छत्रपतींचे वंशज छत्रपती शाहू महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नसले तरी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवला.

कार्यक्रमात माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार बाळ माने, माजी जि. प. अध्यक्ष उदय बने, माजी अध्यक्ष रोहन बने, सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, माजी जि. प. सभापती राजेंद्र महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ, अ. म. फेडरेशन व मराठा बिझनेसमन फोरमचे संस्थापक (कै.) शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आला. तसेच मराठा नेते (कै.) केशवराव भोसले यांच्या कुटुंबियांनाही गौरवण्यात आले. आर्किटेक्ट संतोष तावडे यांना सन्मानित केले. तसेच प्रताप सावंतदेसाई, दीपक साळवी व सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार केला.महासंमेलनाच्या निमित्ताने रत्ननगरी सजली. कार्यक्रमस्थळी स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर, सर्वत्र भगवे ध्वज, तुतारी वादन, सर्वांच्या डोक्यावर फेटे आणि पारंपरिक वेशभूषेत देशातील अखिल मराठा फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाहायला मिळाले. निमित्त होते तिसऱ्या अखिल मराठा महासंमेलनाचे. रत्नागिरीतील मराठा मंडळ आणि क्षत्रिय मराठा मंडळाने या सहआयोजकत्व स्वीकारले व या संमेलनाचे सुरेख नियोजन केले.चौकट संमेलनात रविवारी होणारे कार्यक्रमरविवारी सकाळी १० वाजता आजची जिजाऊ (कर्तबगार मराठी महिला आणि त्यांच्या पुढील आव्हाने) यावर चर्चासत्र होईल. यात अस्मिता मोरे-भोसले, कविता पाटील, डॉ. ज्योती शिंदे, राधिका बराले, डॉ. स्वराली शिंदे अशा नामवंत महिला सहभागी होतील. दुपारी १२ वाजता अभियान उद्योजकतेचे यात प्रथितयश व्यक्तीमत्व उमेश भुजबळराव, उज्वल साठे, प्रफुल्ल तावरे, केतन गावंड, राजेंद्र घाग, सुरेश कदम सहभागी होतील. महिला उद्योगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता सांगता समारंभाचे अध्यक्षस्थान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, सरखेल आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव उपस्थित राहणार आहेत.