धर्मादाय रुग्णालयांवर ऑनलाइन नियंत्रण; विशेष पथकामार्फत वेळोवेळी तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!


मुंबई : धर्मादाय रुग्णालयांमध्येही रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. तसेच धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत आणि रुग्णालयातील खाटा तसेच निर्धन रुग्णनिधीची माहिती मिळावी, यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांतील कारभाराच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे घेतली. या बैठकीत धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्याकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रुग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती ऑनलाइन प्रणाली आणि एका डॅशबोर्डवर उपलब्ध केल्यास रूग्णांना मदत होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या संलग्नीकरण आणि समन्वयासाठीही प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button