
आगामी काळात शहरात पेट्रोलची टंचाई निर्माण होवू शकते महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांचे प्रतिपादन रत्नागिरी शहरात विविध पेट्रोलपंपांवर पेट्रोल खरेदीसाठी मोठमोठ्या रांगा
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. परंतु हा साठा संपल्यानंतर पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी कोकणटुडेशी बोलताना सांगितले. रत्नागिरीला मिरज डेपोतून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. सध्या त्या डेपोच्या परिसरात पाणी भरले आहे. त्यामुळे डेपोत असलेले टँकर्स बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे तेथील पाणी ओसरल्याशिवाय हे टँकर येणे शक्य नाही. त्यातच आंबा घाटातील रस्ता खचल्यामुळे वाहतूकही बंद असल्याने या भागातून आता शहराला पेट्रोल पुरवठा होणे कठीण असल्याने आपण या परिसराला वाशी येथील डेपोतून पुरवठा करण्यात यावा अशी कंपनीकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कंपनीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर त्याला पर्याय निघू शकणार आहे. सध्या पेट्रोल पंपावर असलेल्या पेट्रोलचा साठा संपेपर्यंत विक्री होणार आहे. मात्र त्यानंतर परिस्थिती नियमित होईपर्यंत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहराला डिझेल टंचाई जाणवणार नाही असे मत लोध यांनी व्यक्त केले. कारण डिझेलची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली मालवाहतूक व ट्रकची वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे डिझेलला त्या मानाने मोठ्या प्रमाणावर मागणी नसल्याने डिझेलची टंचाई जाणवू शकेल असे सध्या तरी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग बंद झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोलची येणारी टंचाई लक्षात घेवून वाहनधारकांनी पेट्रोलपंपावर कालपासून रांगा लावल्या आहेत. आजही पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. शहरातील दोन पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्याचे फलक लागले आहेत.
www.konkantoday.com