
मुख्याधिकारी तुषार बाबर यांची खातेनिहाय चौकशी करावी व तोपर्यंत त्यांचे निलंबन करण्याची मनसेची मागणी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थिबा पॅलेस परिसरातील आरक्षण प्रकरण अधिकच तीव्र केले आहे. या जागेवरील वाहनतळ आरक्षण जाणे हे नगरपालिका प्रशासनाचे अपयश व गलथान कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे. खासगी विकासकाच्या घशात भूखंड घालण्यासाठीच संगनमताने असे आरक्षण घालवले जाते असा आरोप करत याप्रकरणी मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांची खातेनिहाय चौकशी करावी व तोपर्यंत त्यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी अधिक बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर म्हणाले की, याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, मीं जिल्हा नियोजनचा अध्यक्ष आहे. मी निधी देऊ शकतो. आत्ता सुद्धा द्यायला तयार आहे. जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री यांची निधी बाबतची तत्परता जगजाहीर असताना मुख्याधिकारी यांनी हा विषय स्वतः पुरताच मर्यादीत ठेवला? या सर्वांना विश्वासात घेऊन आरक्षित जागेच्या खरेदीचा प्रश्न का नाही सोडवला? शहर विकास आराखडा बांधताना प्रत्येक हजारी माणसामागे किती जागा आरक्षित ठेवायाची असते? आरक्षण कशाला असते याची काहीच माहिती मुख्याधिकारी ना नाही का?दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रत नगराविकास मंत्री तसेच वनमंत्री यांना देखील रवाना करण्यात आल्या आहेत.
या प्रकारणामध्ये जे जे दोषी आहेत आणि रत्नागिरी शहर विकास आराखड्याची जे कोणी वाट लावत आहेत त्या सर्वांनाना घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सांगितले.या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर सचिव प्रभात सुर्वे, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.