सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात खालच्या वर्गातील मुलांवर रॅगिंग व शोषण केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एका विद्यालयात खालच्या वर्गातील मुलांवर रॅगिंग व शोषण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या विद्यालयात शिकत असलेल्या वरच्या वर्गातील एकूण पाच विद्यार्थ्यांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना माहिती असून देखील तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार न दिल्याच्या कारणावरून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सदर विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व हाऊस मास्टर यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. यातील शोषित आणि गुन्हा करणारे दोन्ही विधी संघर्ष बालक असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.तालुक्यातील एका विद्यालयात खालच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलांचे वरच्या वर्गातील अल्पवयीन मुलांकडून रॅगिंग व शोषण करण्यात आले होते.
ही घटना पालकांनी उघड करताच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वरच्या वर्गातील पाच मुलांना तातडीने एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते, तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. विद्यालय प्रशासनाने केलेल्या कारवाईवर पालकांचे समाधान न झाल्याने पालकांनी मंगळवारी पोलिस ठाण्यात धाव घेत त्या मुलांविरोधात रितसर तक्रार दिली.
यानुसार पोलिसांनी वरच्या वर्गातील पाच मुलांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत, तर विद्यालय प्रशासनाने कोणतीही गंभीर दखल न घेतल्यानेतसेच पोलिस ठाण्यात या प्रकाराविरोधात तक्रार न दिल्याने प्राचार्य, शिक्षक व हाऊस मास्टर या तिघांवरदेखील ‘पोक्सो’नुसार गुन्हे दाखल करून त्यांना सहआरोपी केले आहे. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक संजय कातिवले करीत आहेत.