![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250116-WA0027-780x470.jpg)
संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी हल्ला करण्यात आला. त्यानंतर सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेवरुन आता आरोप सुरु आहेत. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात काय चाललं आहे? कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरं यामध्ये सरकार गुंतून पडलं आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सामान्य जनता सुरक्षित नाही. घरात, झोपड्यांमध्ये लोक घुसत आहेत. आता कलाकारांच्या घरांमध्ये चोर घुसत आहेत आणि हल्ला करत आहेत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का आहे. १५ दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासह मोदींना भेटायला गेले होते. पंतप्रधान मोदींनी एक तास त्यांच्या कुटुंबासह घालवला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला. या राज्यात कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. या राज्याची ९० टक्के सुरक्षा आणि पोलीस हे आमदार, फुटलेल्या लोकांसाठी आहेत. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते. सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान यांना सुरक्षित राहू शकत नाही हे वास्तव आहे असंही संजय राऊत म्हणाले.अशा प्रकारे हल्ला करणं, कायद्याचं उल्लंघन करणं होतं आहे. त्यामुळे पोलिसांची भीती राहिलेली नाही. सैफ अली खानवर हल्ला होण्याची बाब दुर्दैवी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.*
अभिनेता सैफ अली खान वर हल्ला करण्यात आला आहे. पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना त्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्या व्यक्तीने सैफच्या घरी काम करणाऱ्या गृहसेविकेसह वाद घातला. त्यानंतर सैफ अली खान मधे पडला. सैफवर या अज्ञात इसमाने वार केले. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या आहेत. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.