
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय उभारण्याची वन मंत्र्यांकडे केली मागणी.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.सिंधुदुर्ग जिल्ह्याला समुद्र किनाऱ्यांसह सह्याद्री पर्वतरांगा आणि विस्तीर्ण जंगलांचा लाभ झाला आहे. या परिसरात विविध प्रकारचे वन्यप्राणी आणि पक्षी आढळून येतात. या नैसर्गिक संपत्तीचा पर्यटन विकासासाठी योग्य प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.
प्राणीसंग्रहालय उभारल्यास जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.प्राणीसंग्रहालयामुळे सिंधुदुर्गातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन जिल्हावासीयांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून नैसर्गिक संपत्तीच्या मदतीने हे प्रकल्प यशस्वी करता येईल, असे मत राणे यांनी व्यक्त केले. प्राणीसंग्रहालयाचा पर्यावरणीय आणि आर्थिक लाभही मोठा ठरेल, असा त्यांचा दावा आहे.मंत्री नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालयाच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी वनमंत्री गणेश नाईक यांना आदेश देण्याची विनंती केली आहे. हा प्रकल्प साकारल्यास सिंधुदुर्ग जिल्हा एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असाविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.