
नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश करण्यासाठी आंदोलन.
मिर्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरु असून, महामार्गाची उंची वाढलेली असल्यामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ, रुग्णांना जवळपास आठशे मीटरचा वळसा मारावा लागणार आहे.त्यामुळे बसथांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत ठोस निर्णय न झाल्यास 26 जानेवारी रोजी नाणीजसह या बसथांब्याचा वापर करणार्या आणखी तीन ते चार गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह विविध विभागाच्या अधिकार्यांनाही दिले आहे.