
मैथिली हीचा डोक्यात दगड घालून खून ,पोलीस तपास सुरू
तालुक्यातील खेडशी चिंचवाडी परिसरातील १७ वर्षीय मैथिली हिचा खून झाला असावा अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. अज्ञात इसमाने तिच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारले असावे त्यानंतर तो तेथून फरारी झाला. या युवतीच्या सापडलेल्या मोबाइलकॉल डिटेल्स आधारे एका संशयितांची पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणात नेमक्या कोणत्या आरोपींचा सहभाग होता याचाही पोलिस शोध घेत आहेत.हा प्रकार शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी घडला. शहरानजीकच्या खेडशी चिंचवाडी येथे राहणारी मैथिली प्रवीण गवाणकर हि १७ वर्षीय युवती खेडशी नाक्यावरच असणा-या ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. कॉलेजमधून आल्यानंतर रोज सायंकाळी ती बक-या चरायला घेऊन जात असे. शुक्रवारीही नेहमीप्रमाणे सायंकाळी ४ वा. ती बक-या घेऊन चिंचवाडी येथील कातळावर गेली होती. मात्र सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बक-या नेहमीप्रमाणे घरी आल्या, परंतु त्यांच्यासोबत मैथिली आली नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र तिथेही सापडली नाही. त्यामुळे वडिलांनी वाडीतील लोकांना याची कल्पना दिली. आणि त्यानंतर वाडीतील लोकांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र मैथिलीचा कोणतीही खबर न मिळाल्याने अखेरीस प्रविण गवाणकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन मैथिली बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
याच दरम्यान, चिंचवाडीतील ग्रामस्थ शोध घेत असता, मैथिलीचा मृतदेह कातळावरील आंबा बागेच्या बांधाजवळ आढळून आला. मैथिलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिचं डोकं एका बाजुने चेपले गेले होते याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना दिली. यावेळी ग्रामीण पोलीस स्थानाकाचे निरीक्षक सुरेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषणण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, रत्नागिरी शहरचे पोलीस निरीक्षक अनिल लाड हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तात्काळ तपासालाही सुरूवात झाली. रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत पोलिसांची विविध पथके परिसरात चौकशी व शोध घेत होती.
ज्या पध्दतीने मैथिलीच्या डोक्यात मारण्यात आले होते त्यावरून तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत घटनास्थळावरून मैथिलीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांना घटनास्थळी बांधाला टेकवलेल्या दोन काठ्या सापडल्या जवळच एक पावसाळी टोपीही पोलिसांना सापडली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली व पुढील तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या युवतीच्या मृतदेहाचे विच्छेदन करुन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर शनिवारी सायंकाळी शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.