
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कंपाउंडच्या बाहेर आग विझवत असताना होरपळून वृद्धाचा मृत्यू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घराच्या कंपाऊंडनजीक लागलेली आग आपल्या कंपाऊंडमध्ये येईल या शक्यतेने आग विझविण्यासाठी गेलेले श्रीकृष्ण वसंत प्रभूपाटकर (70, हरकळ बुद्रुक जंगमवाडी-सामंतवाडी) यांचा होरपळून मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.याबाबतची माहिती श्रीकृष्ण प्रभूपाटकर यांचा मुलगा सचिन प्रभूपाटकर याने दिली. सचिन हा कणकवलीतील उबाळे मेडिकलमध्ये कामाला आहे.
मंगळवारी दुपारी त्याच्या मामी सुनंदा सामंत यांनी मोबाईलवर फोन करून तू ताबडतोब घरी ये असे सांगून फोन कट केला. त्यानंतर सचिन तत्काळ मोटारसायकलने घरी गेला. त्यावेळी घराच्या पाठीमागे शंभर मीटर अंतरावर लोक जमा झालेले दिसले. तर वडील श्रीकृष्ण प्रभूपाटकर हे घराच्या कंपाऊंड बाहेर उताणे अवस्थेत दिसून आले. त्यांचे हात पाय ताठरलेले होते, आग विझवताना त्यांचे शरीर जळाल्याचे दिसून आले. त्यांच्या घराच्या कंपाउंड बाहेर आग लागली होती.
ही आग आपल्या कंपाउंडमध्ये येईल आणि नुकसान होईल या भीतीने श्रीकृष्ण प्रभूपाटकर हे आग विझवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचाहोरपळून मृत्यू झाला.त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले.