रोजच्या जगण्यातली, व्यवहारातली भाषा ही मराठी झाली पाहिजे : लेखक ॲड. विलास पाटणे एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : मराठी भाषा जगवण्यासाठी केवळ पाट्या बदलून काही होणार नाही, तर रोजच्या जगण्यातली, व्यवहारातली, रोजगारातली भाषा ही मराठी झाली पाहिजे, तरच ती खऱ्या अर्थाने टिकेल. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला, तरी आजही न्यायालयाची भाषा इंग्रजीत आहे हे आपल्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे.
इंग्रजी भाषा ही जगाची, ज्ञानाची भाषा आहे. ती शिकू नये असे अजिबात नाही; मात्र दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण मुलांनी आपल्या मातृभाषेतूनच घेतले पाहिजे, असे मत रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक ॲड. विलास पाटणे यांनी केले. नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि वाड्.मय मंडळ विभाग यांच्या वतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन आज (१५ जानेवारी) करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी आणि ग्रंथालय विभागाच्या मेघना पोरे उपस्थित होत्या. ॲड. पाटणे पुढे म्हणाले, शब्दाला अस्तित्व असते. आकार असतो, दिशा असते आणि ते नेमकेपणाने शोधले तर आयुष्याचे सोने होते. वाचनासाठी पंधरवडा सुरू करावा याच्याशी मी फार काही सहमत नाही, कारण अंत:प्रेरणेने आपण जे वाचतो, चिंतन मनन करतो ते खरे वाचन. वाचनामुळे भाषा समृद्ध होते. शब्दाला वजन प्राप्त होते. लेखक हा आंतरिक गरजेपोटी लिहितो, पण त्याच्या लिहिण्यातून दुसऱ्याला जगण्याची प्रेरणा देत असतो.साहित्याच्या प्रेमात पडले पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन करतानाच त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, एच. आर. खन्ना, विनोबा भावे यांची उदाहरणे दिली.
ही सर्व मोठी माणसे आपल्या अवतीभवती जन्माला आली. त्यांनी संघर्ष केला. हा संघर्ष वाचला पाहिजे. कारण जे इतिहास विसरतात त्यांना भविष्यात काही करता येत नाही, असे ते म्हणाले. लोकांची जीवनं वाचता त्यांचा मागोवा घेता तेव्हा तुमच्या आयुष्यातही बदल घडत असतात. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या तीन तऱ्हा आहेत. आपण संस्कृती जपली पाहिजे. आयुष्याची लांबी हे आयुष्य आहे, उंची म्हणजे आरोग्य आणि खोली म्हणजे समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी होय. आपल्याकडे नेहमी आयुष्याची खोली बघितली जाते, असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले.चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी हल्ली लिहिणारे कमी आणि कॉपी-पेस्ट करणारे जास्त झाले आहेत याबद्दल खंत व्यक्त केली. वाचनामुळे व्यक्तिमत्व संपन्न होते; मात्र आपण काय वाचतोय हेही महत्त्वाचे आहे.
सर्वसामान्य माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करतो तेव्हा क्रांती घडवतो. चरित्र वाचनातून आपल्याला व्यक्तींची वाटचाल कळते. आजकाल व्हाट्सअप वर वाचले जाते ती केवळ माहिती आहे. ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. ज्ञानाची कक्षा जेवढी वाढवाल तेवढे व्यक्तिमत्व फुलते, असेही श्री. हेगशेट्ये यांनी सांगितले. तत्पूर्वी प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हुमेरा काद्री यांनी केले. प्रा. सुशील साळवी यांनी प्रास्तविक केले. प्रा. अन्विता देवळेकर यांनी आभार मानले.