समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनची नजर मत्स्यव्यवसाय विभागाची तीन नौकांवर कारवाई
रत्नागिरी, दि. 14 :- जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये या दोन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत तीन नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.
जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण व नियंत्रण कक्षाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे हस्ते करण्यात आले होते.
ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत समीर अ. गफूर वस्ता यांची “मोहम्मद सैफ” क्र.आयएनडी-एमएच-4-एमएम-676 ही नौका 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पध्दतीने अनधिकृत मासेमारी करताना आढळल्याने, श्रीम. जबीन कमाल होडेकर यांची “अल कादरी” क्र.आयएनडी-एमएच-4-एमएम-1635 नौका 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पध्दतीने अनधिकृत मासेमारी करतान व इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची नौका “यासीर अली- II” क्र. आयएनडी-एमएच-4-एमएम-5962 विनिर्दिष्ट क्षेत्रात पर्ससिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याने नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी मत्स्य विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याने मच्छिमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अंतर्गत कायद्यांतर्गत अटी शर्तीचा भंग करुन मासेमारी करु नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.