येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही-शिवसेना प्रतोद सुनील प्रभू.
मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी विश्वास व्यक्त केला.बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्रनगर येथील पै. अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक 14 आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक 12 तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
या महोत्सवाची सांगता शिवसेना नेते सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करताना कोकणी, मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी, मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेनेबाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले.