
देवगड येथे मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मार्गावर मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात रस्त्यावर पडून गंभीर दुखापत झाल्याने स्वार रूपेश नंदकुमार कदम (42) याचा मृत्यू झाला.हा अपघात सोमवारी दुपारी 1.15 वा. सुमारास इळये कुणकेश्वर मार्गावर कुणकेश्वर हायस्कूल नजिक झाला.रूपेश कदम हा कुणकेश्वर वाळकेवाडी येथील अजित दिगंबर वाळके यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता.
सोमवारी दुपारी तो मोटारसायकलने इळये-कुणकेश्वर मार्गे देवगडकडे येत असताना त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटून गाडी स्लीप झाली. यात तो रस्त्यावर पडला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक, कुणकेश्वर हायस्कूलचे शिक्षक व कर्मचारी यांनी त्याला देवगड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूपेश हा जामसंडे सोहनीवाडी येथे राहत होता.