दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात!

प्रयागराज : पहाटेच पडलेले घनदाट धुके, कडाक्याची थंडी आणि जवळपास गोठायच्या बेताला आलेले थंड पाणी… अशा हवामानात गंगा, यमुना आणि लुप्त झालेल्या सरस्वतीच्या संगमावरील प्रयागराज येथे भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्साहात सोमवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर महाकुंभाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.

कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुढील ४५ दिवस हा सोहळा सुरू राहणार असून त्याला ४० कोटींपेक्षा जास्त भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. अध्यात्म आणि श्रद्धा, संस्कृती आणि धर्म, परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असा विविध पैलूंचा संगम या सोहळ्यानिमित्त पाहायला मिळत आहे.कुंभमेळा दर १२ वर्षांनी भरतो, त्याशिवाय दर सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरत असतो. मात्र, आता प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा आहे की १४४ वर्षांतून एकदा होणारा महाकुंभमेळा आहे याबाबत साधूसंतांमध्ये मतैक्य नाही. काही साधूंच्या मते हा सोहळा १४४ वर्षांनी महाकुंभमेळा आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य अधिकच वाढले आहे.कुंभमेळ्याला बहुतांशजण गटागटाने येतात. मात्र, काही एकांतात राहणारे साधू-महंत एकेकट्यानेच सोहळ्यात सहभागी होतात.

ंदरम्यान, तुम्हा भारतीयांबरोबर येथे असणे हे माझ्यासाठी खास आहे. मला या पवित्र संगमावर या पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची संधी मिळाली यासाठी मी कृतज्ञ आहे. मी याक्षणी अतिशय समाधानी आहे, असे स्पेनमधील भाविक ज्युली यांनी सांगितले.*साधूसंत ते सामान्यजन*निरनिराळ्या पंथांचे १३ आखाडे महाकुंभामध्ये सहभागी झाले आहेत. त्याशिवाय केवळ कुंभमेळ्याच्या दिवसात हिमालय सोडणारे, अंगाला भस्म चोपडलेले साधू, देशभरातून आणि विदेशातूनही आलेले विविध धार्मिक गटाचे भाविक आणि केवळ उत्सुकतेपोटी कुंभमेळा पाहायला आलेले हौशी अशी मोठीच गर्दी पुढील ४५ दिवस संगमावर पाहायला मिळणार आहे.

पहाटेपासून संगमावर जमलेल्या भाविकांमध्ये शंखध्वनी आणि भजनांचे आवाज येत होते. दूरपर्यंत पसरलेल्या भाविकांच्या गर्दीवरून उत्साहाचा अंदाज येत होता. पाण्याकडे जाताना जय गंगा मैय्या, हर हरम महादेव, जय श्रीराम असा जयजयकार केला जात होता. कपाळावर कुंकू, भस्म लावून घेतले जात होते, त्याशिवाय कुंकवाने राधाकृष्णापासून भोळ्या शंकरापर्यंत विविध देवतांची नावे लिहिली जात होती. भारतीय मूल्ये आणि संस्कृती प्रिय असलेल्या कोट्यवधी लोकांसाठी अतिशय विशेष दिवस आहे! प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात होत आहे. त्यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम पाहायला मिळत आहे. *– नरेंद्र मोदी, पंतप्रधान*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button