
चिपी विमानतळावरून विमान सेवा बंद, नेत्यांमध्ये मात्र कुलूप ठोकण्यावरून आव्हाने -प्रति आव्हाने.
चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरू झाली नाही तर या विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी दिला होता. त्यावर कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना भाजप नेते खा.नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेत वैभव नाईक यांना उद्देशून विमानतळाला टाळे मारूनच दाखव, तुझ्या घराला टाळे ठोकले नाही, तर नारायण राणे नाव सांगणार नाही असा इशारा दिला. राणे आणि ठाकरे शिवसेनेत जुंपल्याने राजकीय वादाची ठिणगी यानिमित्ताने पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राणेंच्या या इशार्यावर वैभव नाईक यांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या धमक्यांना घाबरत नाही, विमानसेवा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकून दाखवू, असे म्हटले आहे.हा वाद ज्या कारणासाठी लागला त्या विमानसेवेत नियमितता येणार तरी कधी? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. चिपी विमानतळावरून अलिकडच्या काळात नियमित विमानसेवा होत नाही. त्यामुळे जिल्हावासियांसह मुंबईसह इतर ठिकाणाहून ये- जा करणार्या पर्यटकांसाठीही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे विमानसेवेच्या नियमितीकरणासाठी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
चिपी विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा माजी आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर खा. नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यटन महोत्सवाच्या समारोपात बोलताना नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. राणे म्हणाले, आपण ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी विरोधकांनी या विमानतळाला विरोध केला. तांत्रिक मुद्याने बंद असलेले चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. पण काही विरोधक मीडियातून धमकी देतात की चिपी विमानतळाला कुलूप ठोकणार. पोलिसांना सांगतो जर कोणी अशी धमकी देत असेल तर गुन्हे नोंदवा. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे.