कोंढव्यात बसून चीनची मदत, 8 कोटी 71 लाखांचा नफा, 15 सिमकार्ड, 8 चेकबुक, 20 ATM पुण्यात खळबळ, प्रकरण काय?

पुणे : शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी केला आहे.

या टोळीचे चायनीज सायबर चोरट्यांशी थेट संबंध असून ते त्यांच्यासाठी स्थानिक बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अंदाजे १५० ते १६० नागरिकांची तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात यश भारत पाटोळे (२५, रा. रमण मळा, कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (३४, रा. उंड्री), मोहम्मद सुलतान अहमद (३०, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (२४, रा. घोरपडी पेठ), हुसेन ताहीर सोहेल शेख (२३, रा. संभाजीनगर), आणि बाबुराव शिवकिरण मेरु (४१, रा. हडपसर) यांना अटक करण्यात आले आहे.

फेसबुक जाहिरातीवरून सुरू झाली फसवणूक

एका फार्मा कंपनीतील प्रोग्रामरला फेसबुकवर शेअर मार्केटमधील मोठ्या नफ्याचे आमिष दाखवणारी जाहिरात दिसली. त्या जाहिरातीच्या माध्यमातून त्याला ‘कोटक क्युआयबी’ नावाच्या बनावट ट्रेडिंग अ‍ॅपकडे वळवण्यात आले. या अ‍ॅपवर त्याने तब्बल ८९ लाख ३५ हजार रुपये गुंतवले. अ‍ॅपवर त्याला ८ कोटी ७१ लाखांचा नफा दाखवण्यात आला. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच ‘सर्व्हिस टॅक्स’ भरण्याच्या नावाखाली त्याची फसवणूक करण्यात आली.

खात्यांचा वापर आणि अटक

या गुन्ह्यात आरोपींनी कॉसमॉस बँकेतील एका खात्याचा वापर केला होता. या खात्यातून ३३ लाख ८६ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तपासादरम्यान हे खाते ‘ट्रेडिंग गुरु’ या नावाने यश पाटोळे चालवत असल्याचे समोर आले. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी त्याला कोंढव्यातील हॉटेलमध्ये ताब्यात घेतले आहे. चौकशीतून त्याचे इतर साथीदार ओंकार प्राईड हॉटेलमध्ये राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी छापा टाकून उर्वरित ५ जणांना ओंकार प्राईड हॉटेलमधून अटक केली आहे.
चायनीज नेटवर्कशी संगनमत

ही टोळी टेलिग्रामद्वारे चायनीज सायबर फसवणूक करणार्‍यांच्या संपर्कात होती. त्यांनी सांगलीतील नागरिकांची बँक खाती वापरून व्यवहार केले. या खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम परदेशात क्रिप्टोकरन्सी आणि USDT च्या माध्यमातून पाठवण्यात येत होती. याशिवाय हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर मार्गांनी रक्कम परदेशात वळवली जात होती. छाप्यात पोलिसांनी ९ मोबाईल फोन, १५ सिमकार्ड, ४ सीसीटीव्ही कॅमेरे, ८ चेकबुक, २० एटीएम कार्ड, १ लॅपटॉप, १ मेमरी कार्ड, १ पासपोर्ट आणि १३ हजार ५५० रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी आतापर्यंत १५० ते १६० नागरिकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत. सायबर पोलिसांकडून आरोपींच्या परदेशी संपर्कांचा तपास सुरु असून आणखी मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button