दोन दिवसांत १० हजार गाड्यांना बसवली ‘एचएसआरपी’ प्लेट!
मुंबई : राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) २०१९पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी ७ जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून, पहिल्या दोन दिवसांमध्ये सुमारे १० हजार वाहनांवर बसविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय स्पीड प्लेट बसविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांत तीन झोनमध्ये तीन वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक केली आहे. त्यानुसार झोन १मध्ये १२ आरटीओ कार्यालये, झोन २मध्ये १६, तर झोन ३मध्ये २७ आरटीओ कार्यालयांचा समावेश आहे. नियुक्त केलेल्या संस्थांकडून ही नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट्सवर निळ्या रंगामध्ये इंग्रजी भाषेत ‘आयएनडी’ लिहिले असते. त्याच्या वर क्रोममध्ये अशोक चक्राचा होलोग्राम स्टॅम्प असतो. याच्या बाजूला वाहनाचा नोंदणी क्रमांक असतो. या प्लेटवर क्रमांक एम्बॉसिंग होत असल्याने त्यात फेरफार करणे अशक्य असते. तसेच चोरीची वाहने शोधण्यास मदत होते. *अतिरिक्त शुक्ल भरावे लागणार*वाहनाचा प्रकार – शुल्क(जीएसटी वगळून)दुचाकी ४५० तीनचाकी ५०० कार ७५० ट्रॅक्टर ४५०