
गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्थानिक प्रश्नांवर विचार करण्यास आणि आपल्या लेखणीतून ते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा’ यांच्या वतीने दरवर्षी ‘छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी स्पर्धेचे ७ वे वर्ष असून या स्पर्धेसाठी निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, उपाध्यक्ष मंगेश धावडे आणि जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तरुणांना आपल्या भागातील आरोग्य सुविधा, कृषी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लिखाण करण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेमागील प्रामाणिक उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे विषय आणि नियम :
यावर्षी महाविद्यालयीन खुल्या गटासाठी खालील दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी “जिल्ह्यातील आरोग्य सुविधा : सद्यस्थिती, आव्हाने आणि अपेक्षा” आणि “आंबा-काजूच्या पलीकडे : रत्नागिरीतील कृषी विकास का झाला नाही” हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धकांनी १००० ते १२०० शब्दांत स्व-लिखित आणि मराठी भाषेतील निबंध सादर करणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम ५००१, ३००१ आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध ‘एम जी टेक्नॉलॉजी, देवरुख हायस्कूल समोर, देवरुख, तालुका-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी’ या पत्त्यावर अंतिम मुदतीपर्यंत पाठवावेत.
अधिक माहितीसाठी दीक्षा खंडागळे (9404158384), अनघा कांगणे (8552974073), नितीन गोताड (9322516886) आणि मुझम्मिल काझी (9604760330) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.




