पुण्यातील पर्यटकांच्या गाडीतून ऐवज चोरणारा चोरटा सापडला.
हर्णे बंदर येथे पर्यटकांच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.तालुक्यातील हर्णे येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवा खुर्द येथील धनश्री वाडकर यांच्या मोबाईलसह सुमारे १३,२०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. चोरट्याने पर्यटकांच्या गाडीत खिडकीतून शिरून हा ऐवज लांबवला होता. दापोली पोलिसांच्या माहितीनुसार, धनश्री वाडकर या बुधवारी सकाळी मासे खरेदीसाठी हर्णे बंदरात आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते.
हे सर्वजण पांढऱ्या रंगाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून तेथे गेले होते. मासे खरेदी करण्यासाठी हर्णे बंदर येथे गाडी उभी करून सर्वजण मासे खरेदीला खाली उतरले होते. त्यावेळी चोरट्याने गाडीच्या खिडकीतून गाडीत प्रवेश करत गाडीत असणारा वाडकर यांचा सुमारे ८ हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि ५,२०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत होते.गोपनीय माहीतगाराकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्हीचे मिळालेले फुटेज आणि पेट्रोलिंगच्या वेळेस सदर गुन्हेगाराच्या संशयित हालचाली वरून साहिम मुस्तफा आयनरकर; वय – २५, रा. – मुरुड, ता.- दापोली याला पोलिसांनी सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे सुरुवातीस पर्यटकांची चोरीस गेलेली रक्कम ५२००/- आढळून आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याठिकाणी मोबाईल सुद्धा त्याच्याकडेच असल्याची कबुली त्याने यावेळी दिली