‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक!

‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजेच डिजिटल अटक हा घोटाळा गेल्या काही काळापासून भारतीय नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सीबीआय, सीआयडी, ईडी किंवा पोलीस विभागाकडून बोलत असल्याचे भासवून असंख्य नागरिक या घोटाळ्याला बळी पडले आहेत.* दोन किंवा काहींना तीन-तीन दिवस डिजिटल अटकेत ठेवून त्यांचे शोषण करण्यात आले. मालमत्ता विकण्यास भाग पाडून, काहींची संपूर्ण बचत हडप करून घोटाळेबाजांनी देशभरात उच्छाद मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घोटाळ्याला बळी पडू नका, असे आवाहन केले होते. अखेर कोलकाता पोलिसांनी या घोटाळ्यातील एका मुख्य आरोपीच्या बंगळुरूमधून मुसक्या आवळ्याचे सांगण्यात येत आहे.कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग कपूर नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हा या घोटाळ्यातील एक प्रमुख मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. कपूर ९३० प्रकरणांत आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाता येथील देबश्री दत्ता यांची ४७ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांच्या नावाचा गैरवापर करून एक पार्सल पाठवले गेले आहे आणि त्यात अमली पदार्थ आढळ्याचा बनाव एका कथित अधिकाऱ्याने व्हिडीओ कॉलद्वारे केला होता. कायदेशीर कारवाईची धमकी देऊन घोटाळेबाजांनी दत्ता यांची ४७ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणाचा शोध घेत असताना कोलकाता पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.कोलकाता पोलिसांनी बंगळुरूमधून ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

त्यापैकी चिराग कपूर हाही एक आहे. तो चिंतक राज या नावाने बंगळुरूच्या जेपी नगर भागात राहत होता. स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणवणारा कपूर मागच्या सात महिन्यांपासून हे रॅकेट चालवत होता. बंगळुरुमध्ये कारवाई करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, आम्ही पहाटे ४.३० वाजता कपूरच्या घरावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. आरोपीने स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे सांगितले. मात्र आम्ही त्याच्या दाव्याची सत्यता तपासत आहोत.धाड टाकलेल्या घरातून काही उपकरणे जप्त करण्यात आलेली असून त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.

सायबर गुन्हेगार नवनवीन युक्ती काढून अनेकांची लुबाडणूक करतात. ती करण्यासाठीच ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची युक्ती गुन्हेगार वापरत आहेत. या गुन्हेगारांची टोळी पीडितांना पोलीस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग, लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करतात. देशविघातक कृत्य, बेकायदेशीर वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगतात. यात पीडित व्यक्तीला २४ तासांपर्यंत त्याच्याच घरात व्हिडीओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते. सायबर गुन्हेगार व्हिडीओ कॉलवर कुठल्या तरी पोलीस स्टेशन किंवा सीबीआयसारख्या एजन्सीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवतात. त्यामुळे पीडित व्यक्तीचा विश्वास बसतो. पीडित व्यक्ती खरेच तिला ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे मानू लागते. यादरम्यान, सायबर गुन्हेगार त्यांना खंडणीची मागणी करतो. पैसे न दिल्यास प्रत्यक्षात अटक करण्याची भीती दाखवतो. त्यामुळे अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या नव्या शक्कलेला बळी पडतात आणि लाखो रुपये त्यांच्या घशात घालतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button