
त्यानंतरच रत्नागिरी जिल्ह्यात होईल भारनियमन…
रत्नागिरी जिल्हा ए, बी, सी, डी गटात मोडत असल्याने नियोजित भारनियमन नाही. मात्र महानिर्मितीच्या आपटी येथून अचानक भारनियमनाबाबत संदेश येईल, तेव्हाच रत्नागिरी जिल्ह्यात वीज भारनियमन होणार आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. आतापर्यंत 14 एप्रिलला एकदाच भारनियमनाचा संदेश आल्यानंतर दीड तासांचे भारनियमन झाले आहे. मात्र पुरेशी वीजनिर्मिती होईपर्यंत पुढेही जिल्ह्यात वीज भारनियमन होण्याची भीती कायम आहे.
विजेची तूट भरून काढण्यासाठी 14 एप्रिल रोजी महानिर्मितीकडून अत्यावश्यक भारनियमनाचा संदेश आला होता. त्यानुसार दीड तास वीजपुरवठा बंद होता. त्यानंतर गेल्या चार दिवसांत असा संदेश आला नाही. मात्र देखभाल दुरुस्ती आणि इतर किरकोळ कामांसाठी अधुनमधून वीजपुरवठा खंडित होत आहे. ज्या ठिकाणचे किरकोळ काम असते त्या ठिकाणच्या डीपीवरील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद केला जात आहे.
वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याने भारनियमनाचे संकट निर्माण झाले आहे. विजेची तूट भरून काढण्यासाठी काही श्रेणीतील गटांमध्ये अत्यावश्यक भारनियमन केले जात आहे. ज्या भागात विजेची चोरी, वीज बिल थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे अशा इएफजी गटांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी भारनियमन होत आहे.
रत्नागिरी जिल्हा पहिल्या ए, बी, सी, डी गटात मोडत असल्याने भारनियमनातून वगळण्यात आला आहे. वीज चोरी नसणे आणि वीज बिल वसुलीचे प्रमाण समाधानकारक असल्याने रत्नागिरी जिल्हा सुदैवी ठरला आहे. तरीही महानिर्मितीकडून अचानक संदेश आल्यास भारनियमन होणारच आहे.