
बार असोसिएशनच्या सर्व कामात मी सदैव बरोबर” -उद्योगमंत्री उदय सामंत
” आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मी सलग पाच वेळा निवडून आलो आहे .तुम्ही सांगितलेली कामे मार्गी लावणे ,माझी जबाबदारी आहे .रत्नागिरी एव्हढे चांगले वातावरण महाराष्ट्रात अन्य बारमध्ये नाही याचा मला अभिमान आहे . मराठी भाषेला अभिजात दर्जाचा अध्यादेश मला काढून घेता आला हे तसेच वकिल ट्रेनिंगसाठी तीन एकर जागा उपलब्ध करून देता आले हे मी माझे भाग्य समजतो .न्यायिक व्यवस्था यातून अधिक सुदृढ होईल. “असे उदगार राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी बार असोसिएशन तर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात काढले . बारचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा यथोचित सत्कार केला .
बारच्या हॉलकरिता जिल्हा नियोजन मंडळाच्या कडून तीस लाखाचा निधी ना. सामंत यांनी उपलब्ध करून दिला यासंबधी त्यानी आभार व्यक्त करून नियोजित लॉयर्स हॉलकरीता सहकार्य करावे अशी विनंती केली . राजस्थान,कर्नाटक राज्याप्रमाणे वकिल संरक्षण कायदा महाराष्ट्र सरकारने त्वरित मंजूर करावा अशी मागणी ॲड विलास पाटणे यांनी केली. सहकार न्यायालय नियमितपणे व कोकण कमिशनर यांचे कॅम्प रत्नागिरीत त्वरित सुरू करावे अशी मागणी ॲड. भाई गवाणकर यांनी केली. ॲड दिलीप धारिया ,ॲड शम्मी पडवेकर यांची समचोयित भाषणे झाली . कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनीही सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड शाल्मली अंबुळकर यांनी केले .ॲड अवधूत कलंबटे,ॲड पराग शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता विशेष प्रयत्न केले .