
आजकालच्या राजकारणात महाभारताचे प्रतिबिंब- हभप चारुदत्तबुवा आफळे.
रत्नागिरी : आजकालच्या राजकारणात ठायी ठायी महाभारताचे प्रतिबिंब दिसते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे चौदावा कीर्तन महोत्सव येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरील भव्य सभामंडपात सुरू आहे. महाभारत हा यावेळच्या महोत्सवाचा आख्यानविषय आहे. पहिल्या दिवशी महाभारताची ओळख करून देतानाच त्यांनी सध्याच्या राजकारणातही महाभारतासारखेच अनेक प्रसंग दिसत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, एक लाखांहून अधिक ओव्या असलेल्या महाभारताची १८ पर्वे आहेत. त्यापैकी ४ मोठी आहेत. त्यांचे निरूपण यावर्षी होणार आहे.
या साऱ्याचा अभ्यास करताना चालू राजकारणाशी तुलना केली, तर अनेक साम्ये दिसतात. आपल्या चांगल्यासाठी ज्याने काम केले असेल, त्याच्या जिवावर उठायचे आणि ज्याने आपले आयुष्यभर वाईट केले असेल, त्याच्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही, असे प्रसंग आपण पाहतो. ज्यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता होती आणि जे आरक्षण देऊ शकत होते, त्यांनी आरक्षण देण्याचे काहीही काम केले नाही. पण त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही आणि आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी जास्तीत जास्त कष्ट केले, त्याची फक्त टिंगलटवाळी करायची, त्याच्याविरुद्ध मोर्चे काढत बसायचे, असे सारे सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता आफळेबुवा म्हणाले, त्यांना कोणी खरबुजा टरबूजा म्हणाले. पण हे म्हणणाऱ्यांना कोणी पडवळ म्हटले, तर राग का येतो? ज्यांना स्वतःचे हित कळतच नाही, ते ज्यांनी दिले त्यांना शिव्या घालतात आणि जो काही देत नाही त्यांचे गोडवे गातात. ज्याने खरेच न्यायालयामध्ये झगडून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, त्याला शिव्या घालायच्या आणि तुम्हाला आरक्षण देणे शक्य नाही अशी वक्तव्ये ज्यांनी केली, त्यांचे गोडवे गायचे, हा अनुभव आपण घेतला आहे. महाभारतातील कुठलेही वाक्य म्हटले, तरी ते आत्ताच्या चालू राजकारणाला चपखल लागू पडते. महाभारतामध्येही अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत.
बुवांनी व्यासांचा, धृतराष्ट्र, पंडू राजाचा जन्म , भीष्म प्रतिज्ञा, गांधारी, कुंती, माद्री, वेदमंत्रांपासून झालेली पांडवाची उत्पत्ती इत्यादींची माहिती यावेळी दिली. तसेच या साऱ्या इतिहासातील अनेक प्रसंग आजच्या राजकारणातही कसे दिसतात, याचे दाखले दिले..