शिंदे यांच्‍या शिवसेनेवर टीका करण्याचा त्‍यांना अधिकार अथवा त्‍यांची कुवत नाही उदय सामंत यांनी पुण्यातील त्या नगरसेवकांना सुनावले.

पुण्यातील ठाकरे गटाचे पाच नगरसेवक अगोदर आमच्या शिवसेनेत येणार होते; परंतु अचानक त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कुठल्या पक्षात जायचे, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्‍यानंतर एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेवर टीका करण्याचा त्‍यांना अधिकार अथवा त्‍यांची कुवत नाही. त्‍यांनी आम्‍हाला दुखावण्याचे काम करू नये. ज्या पक्षात गेलात, त्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल का, याचे आत्मचिंतन करून पाहा, असा सल्‍ला राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्या नगरसेवकांना समज द्यावी, याकडे लक्ष वेधले. शहरात उद्योग आणि भाषा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. हिंदुत्वासाठी ठाकरेंची शिवसेना सोडली, तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना ही व्यक्तिकेंद्रीत असल्याचे मत भाजपवासी झालेल्या पुण्यातील पाच माजीनगरसेवकांनी मांडले होते.

यासंदर्भात उदय सामंत म्‍हणाले, कुठल्या पक्षात जायचे, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मात्र, त्‍यांना आमच्‍यावर टीका करण्याचा अधिकार नाही. महायुती सरकारमध्ये सर्वांनी एकत्रितपणे काम केले जात आहे. आता भाजपमध्ये गेल्‍यानंतर शिंदे सरकारवर काहीही बोलणे बंद केले पाहिजे. भाजपमध्ये प्रवेश करताना प्रवक्‍ते बनू नका, असा टोलाही त्‍यांनी त्‍या नगरसेवकांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button