
कोकणातील पॅसेंजर गाड्या सुरू होईपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही- माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा.
कोकणवासी यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेला दिला आहे.गुरुवारी राऊत यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेतली. या भेटीत गाडी सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर-सावंतवाडी गाड्या कोकणवासीयांसाठी जीवनरेखा होत्या. हजारो मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ही स्वस्त आणि सहज उपलब्ध सेवा होती. मात्र, कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर रेल्वेवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. त्यातच आता या वेळेत गोरखपूर आणि बरेली गाड्या सुरू करण्याचा घाटात रेल्वेने घातला आहे. पण कोकणवासीयांसाठीच्या पॅसेंजर गाड्या बंदच आहे.
विनायक राऊत यांनी महाव्यवस्थापकांसमोर रोखठोक भूमिका मांडली. “दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या सुरू करण्यात आम्हालाविरोध नाही. मात्र, कोकणवासीयांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू न करता, इतर गाड्यांना प्राधान्य देणे हे कोकणवासीयांवर अन्याय आहे. या गाड्या सुरू होईपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.