लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक आता सोमवारीही पर्यटकांसाठी खुले राहणार श्री. राजाभाऊ लिमये त्यांच्या तक्रारीनंतर नामदार उदय सामंत यांनी पुरातत्त्व खात्याला दिले आदेश
रत्नागिरी : रत्नागिरीच्या टिळक आळीत लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक सुशोभीकरणानंतरही दर सोमवारी साप्ताहिक सुटी घेऊन बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे स्मारकाला भेटी देण्यासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचा हिरमोड होऊन स्मारक भेटीची संधी हुकल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात होती. अखेर जेष्ठ पत्रकार श्री. राजाभाऊ लिमये यांनी दिनांक ९ जानेवारी रोजी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर ना. सामंत यांनी तात्काळ पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून हे स्मारक यापुढे कोणतीही सुट्टी न घेता वर्षाचे बारा महिने पर्यटकांसाठी खुले ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
लोकमान्य टिळक स्मारकाचे सुशोभीकरण नामदार सामंत यांनी मोठा निधी देऊन करून घेतले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याला राष्ट्रीय स्मारकापुढे साप्ताहिक सुट्टी महत्वाची वाटत होती. यापूर्वीही दर रविवारी हे स्मारक बंद ठेवण्यात येत असे. याप्रकरणी साप्ताहिक सुट्टी रविवार ऐवजी सोमवारी घेऊन स्मारक बंद ठेवण्याचा प्रघात पडला होता. नामदार सामंत यांच्या या कार्यवाही बद्दल लिमये यांनी त्यांना धन्यवाद दिले असून स्मारक प्रेमींकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.