रुपया ८५.८७ च्या गाळात!
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून रुपयाने बुधवारच्या सत्रात नवीन नीचांक नोंदविला. प्रति डॉलर रुपया आणखी १३ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८५.८७ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि इतर परदेशी चलनांच्या तुलनेत डॉलरच्या वाढत्या वर्चस्वाने रुपयाला अधिक कमकुवत केले.*आंतर बँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८५.८२ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १३ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८५.८७ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले.
सत्रादरम्यान ते ८५.८९ पातळीपर्यंत गडगडले होते. ही डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक नीचांकी घसरण आहे. मंगळवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ६ पैशांनी घसरून ८५.७४ वर स्थिरावला होता.परदेशी चलन विश्लेषकांच्या मते, देशांतर्गत भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा मावळलेला उत्साह आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू आहे. शिवाय अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली.
दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी वाढून १०८.७६ वर व्यवहार करतो आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचा व्याजदर कपातीचा वेग देखील कमी होण्याच्या शक्यतेने १० वर्ष मुदतीचे अमेरिकी रोखे उत्पन्नवरील परतावा दर ४.६७ टक्क्यांपर्यंत वधारला आहे.