अतिक्रमण करणारी मलपी कर्नाटकातील मासेमारी नौका मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या गस्ती पथकाकडून ताब्यात
रत्नागिरी, दि. 9 :- मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांचे अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून 8 जानेवारी रोजी रात्रौ मिळताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस या दिशेने मार्गक्रमण करण्यात आली. काल रात्री सुमारे 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान मलपी येथील 35 – 40 हायस्पीड ट्रॉलर नौका निदर्शनास आल्या. या नौकांचा पाठलाग करत असता नौका “अधिरा” IND-KL-02-MM5724 या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रसंगावधान राखून पकडलेली नौका सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली.
इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी सदर बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली.
दरम्यान सदर बाब निदर्शनास स्थानिक मच्छीमार यांच्या निदर्शनास येताच आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौके वरून पाठवण्यात आले. मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्तीनौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली.
गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतरत्र नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता. मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. सदरच्या नौकेवर म.सा. मा. नि. अ. 1981 अंतर्गत दावा दाखल करण्याची कारवाई आज करण्यात येईल.