
जलजीवन योजनेतील कामात खासदार विनायक राऊत यांनी सव्वातीन कोटींची रक्कम ठेकेदाराकडून स्वीकारून मोठा भ्रष्टाचार केला-निलेश राणे
लांजा तालुक्यात केंद्र सरकारच्या मदतीवर ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जलजीवन योजनेतील कामात ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सव्वातीन कोटींची रक्कम ठेकेदाराकडून स्वीकारून मोठा भ्रष्टाचार केला.कामे न करताच पैसे हडप करण्यात आले, असा गंभीर आरोप भाजप नेते व कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या भ्रष्टाचाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे पैसे चोरणारा खासदार म्हणून विनायक राऊत यांची नवी ओळख झाली आहे, असेही ते म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी 64 कोटी 41 लाख 67 हजारांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून तालुक्यातील 109 महसुली गावात कामे होणार होती. 33 कोटी 92 लाख 30 हजारांची कामे शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हा समन्वयक व शिव साई असोसिएटचा मुख्य प्रमोटर रवींद्र डोळस यांनी घेतली होती. जवळपास एका गावातीलच फक्त 13 लाख रुपये किमतीची कामे पूर्ण असताना त्या ठेकेदार कंपनीला 16 कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली.www.konkantoday.com