गंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात धोक्याचा इशारा!

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नुकतीच दिली. ‘सीपीसीबी’ने यासंबंधीचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) मुख्य खंडपीठासमोर सादर केला. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावत असताना ही चिंताजनक माहिती उघड झाली आहे.

सीपीसीबी’ने ३ फेब्रुवारीला तयार केलेला हा अहवाल नुकताच ‘एनजीटी’च्या मुख्य खंडपीठाला सादर करण्यात आला. खंडपीठात अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव, न्या. सुधीर अगरवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए सेंथिल वेल यांचा समावेश आहे. महाकुंभादरम्यान विशेष मुहूर्तांसह इतर दिवशी भाविक संगमावर मोठ्या प्रमाणात स्नान करत असल्यामुळे पाण्यात ‘एफसी’चे प्रमाण वाढले आहे असे अहवालात म्हटले आहे.वाराणसीतील वकील सौरभ तिवारी यांनी प्रयागराजमधील गंगा व यमुनेच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल दाखल केलेल्या तक्रारीवर ‘एनजीटी’मध्ये सुनावणी सुरू आहे. महाकुंभादरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असल्याच्या आरोपांचीही लवादाकडून शहानिशा केली जात आहे.

नागपूर :* गंगेच्या पाण्यात स्वत:ला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचा दावा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांनी केला होता. परंतु, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) ‘नीरी’च्या शास्त्रज्ञाचा हा दावा खोडून काढला आहे. ‘नीरी’चे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांनी गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात ‘बॅक्टेरियोफेज’ राहत असून ते गंगेचे पाणी प्रदूषित होण्यापासून रोखतात, असा दावा केला होता. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही नद्यांचे पाणी अंघोळीसाठी योग्य नसल्याचा अहवाल दिल्याने ‘नीरी’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’अंतर्गत डॉ. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले होते. ‘सीपीसीबी’चा अहवाल समोर येताच डॉ. खैरनार यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

नवी दिल्ली :* महाकुंभादरम्यान गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (यूपीपीसीबी) सादर केलेल्या अहवालात तपशीलांचा अहवाल आहे असे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बुधवारी उत्तर प्रदेश सरकार आणि ‘यूपीपीसीबी’ला फटकारले. मंडळाने सादर केलेल्या अहवालात प्रयागराजमध्ये गंगेच्या पाण्यातील एफसी आणि ऑक्सिजनच्या पातळीसारखे पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडांविषयी इतर तपशील पुरेसे सादर केले नाहीत असे ‘एनजीटी’ने म्हटले आहे. लवादाने राज्य सरकारला प्रयागराजमध्ये निरनिराळ्या ठिकाणी नमुने घेऊन पाण्याच्या गुणवत्तेचा सर्वात अलिकडील विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी दिला.’एनजीटी’ने मागील वर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या आदेशाच्या अनुपालनाविषयी दाखल याचिकेवर लवादासमोर सुनावणी सुरू आहे.

भाविक जिथे जिथे स्नान करत आहेत त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने १२, १३ जानेवारीला संकलित करून त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म (एफसी) हे मानवी व प्राण्यांच्या विष्ठेत आढळणारे जिवाणू सापडले. स्नान करण्यासाठी नदीच्या पाण्याची प्राथमिक गुणवत्ता मानक राखण्यात अपयश आल्याचे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संगमाच्या वरील भागात ताजे पाणी सोडले गेले. त्यामुळे सेंद्रिय प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले तरीही ‘एफसी’चे प्रमाण चिंताजनक पातळीवरच आहे.’यूपीपीसीबी’ घेत असलेल्या खबरदारीची ‘सीपीसीबी’नेही त्यांच्या अहवालात पुष्टी केली आहे. राज्य आणि केंद्रीय मंडळे सातत्याने पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहेत. संगमाचे पाणी आता स्नान आणि धार्मिक विधींसाठी योग्य असल्याचे अलीकडील अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे.

संगमाच्या पाण्यात विष्ठेतील विषाणू आढळत असल्याचे निष्कर्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी फेटाळून लावले. हे पाणी स्नान व आचमन करण्यासाठी योग्य असल्याचा दावा त्यांनी विधानसभेत बोलताना केला. ‘सीपीसीबी’सह उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (यूपीपीसीबी) सातत्याने संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहेत असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाचे सरकार असताना पाण्याची गुणवत्ता अधिक वाईट होती अशी टीका त्यांनी केली.

सीपीसीबीचा अहवाल

● सद्यास्थितीला गंगेचे पाणी स्नान करण्यासाठी असुरक्षित

● पाण्यातील जैविक घटकांच्या विघटनासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण (बीओडी) विहित मर्यादेपेक्षा अधिक

● ‘बीओडी’ हे पाण्याची गुणवत्ता निर्धारित करण्याचा महत्त्वपूर्ण मापदंड

● ‘बीओडी’चे प्रमाण जितके अधिक तितके त्यातील जैविक घटकांचे प्रमाण जास्त

● प्रतिलीटर तीन मिग्रॅपेक्षा कमी ‘बीओडी’ असलेले पाणी स्नानासाठी सुरक्षित

● १६ जानेवारीला पहाटे ५ वाजता संगमाच्या पाण्याचे ‘बीओडी’ प्रमाण ५.०९ मिलीग्रॅम (मिग्रॅ )

● १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता संगमाच्या पाण्याचे ‘बीओडी’ प्रमाण ४.६ मिग्रॅ

● १९ जानेवारीला सकाळी ८ वाजता पाण्याचे ‘बीओडी’ प्रमाण ५.२९ मिग्रॅ

● १३ जानेवारीला महाकुंभ सुरू झाला तेव्हा संगमाच्या पाण्याचे ‘बीओडी’ प्रमाण ३.९४ मिग्रॅ

● १४ जानेवारीला ‘बीओडी’चे प्रमाण २.२८ मिग्रॅ आणि १५ जानेवारीला १ मिग्रॅ

● ‘बीओडी’चे प्रमाण कमी करण्यासाठी नदीत दररोज १० हजार ते ११ हजार क्युसेक वेगाने ताज्या पाण्याचा विसर्ग

● महाकुंभ नगरात कोणत्याही वेळी ५० लाख ते १ कोटी भाविकांचे वास्तव्य

● दररोज किमान १६ दशलक्ष लीटर मलमूत्राच्या पाण्याची निर्मिती

● दररोज किमान २४० दशलक्ष लीटर सांडपाण्याची निर्मिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button