रत्नागिरीत उद्यापासून १४वा कीर्तनसंध्या महोत्सव; महाभारतकथा ऐकण्याची पर्वणी

रत्नागिरी : कीर्तनातून समाजप्रबोधनाचे व्रत अंगीकारून रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे १४वे पर्व उद्यापासून (आठ जानेवारी २०२५) रत्नागिरीत सुरू होत आहे. कीर्तनसंध्या महोत्सवात यंदा सर्वांत मनोवेधक, अनोख्या, अनुकरणीय अशा महाभारत या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे करणार आहेत. १२ जानेवारीपर्यंत हा उत्सव रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलात होणार आहे.

पितांबरी उद्योगसमूह हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत.गेली तेरा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या वर्षी अयोध्येतील राममंदिर पुनर्निमाणाचे औचित्य साधून “आले रामराज्य” या विषयावर रामकथा गीत रामायण आणि कीर्तन असा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळीसुद्धा असाच एक ऐतिहासिक कालखंड कीर्तनप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न कीर्तनसंध्या समूह करत आहे. महाभारत हे प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठे महाकाव्य आहे. या महाकाव्यात त्यावेळचा इतिहास सुमारे एक लाख ११ हजार श्लोकांमध्ये लिहिलेला आहे.

महाभारत हा प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ महर्षी व्यास यांनी गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे. या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते. महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. हा ग्रंथ साहित्यातील सर्वांत अनोख्या ग्रंथांपैकी एक मानला जात असून आजही तो प्रत्येक भारतीयासाठी एक अनुकरणीय स्रोत आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इसवी सनपूर्व २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इसवी सन पूर्व २००० इतका मागे जाऊ शकतो.

महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. मात्र ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगीकारावी, महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते.

या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.हा सारा इतिहास यावेळी आफळेबुवा उलगडणार आहेत. त्यांना केदार लिंगायत (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम), उदय गोखले (व्हायोलिन), अमेय किल्लेकर (एबल्टन) संगीतसाथ करणार आहेत. पितांबरी उद्योग समूह कीर्तनसंध्याचे मुख्य प्रायोजक असून ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल होणार आहे. नीटनेटके आयोजन, प्रशस्त बैठक व्यवस्था असणारा कीर्तनसंध्या महोत्सव असून महोत्सवात नेहमीप्रमाणेच सर्व व्यवस्था असणार आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने प्रवचनकार श्री. धनंजय चितळे यांनी लिहिलेली १८ लेखांची ‘अपरिचित महाभारत’ या विषयावरील लेखमाला कोकण मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. ती लेखमाला कीर्तनसंध्या महोत्सवात पुस्तिकारूपात प्रकाशित केली जाणार आहे.

कीर्तनप्रेमींनी नेहमीच्याच उत्साहाने महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत जोशी (90116 62220) यांच्याशी संपर्क साधावा.कीर्तनसंध्या परिवाराची सामाजिक बांधिलकीकीर्तनसंध्या परिवारातर्फे आतापर्यंत सहा सामाजिक, तीन सांस्कृतिक आणि तीन विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे सत्कार करण्यात आले. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असताना रत्नागिरी पालिका सफाई कामगार, गणपतीपुळे येथील जीवरक्षक, आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, कीर्तन परंपरेतील सर्वोच्च हभप दत्तदासबुवा घाग, हभप ढोल्ये बुवा, गोरक्षक मुकेश गुंदेचा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबातील सात्यकी सावरकर, निवृत्त सेनाधिकारी राजेंद्र निंभोरकर, सौ. निंभोरकर, वृद्धाश्रम चालवणाऱ्या गायत्री फडके, सौ. शुभांगी चारुदत्त आफळे, रत्नागिरीतील माजी सैनिक समूह, श्रीराम मंदिर पुनर्निर्माणात महत्त्वाचीच भूमिका बजावणारे निवडक कारसेवक, सोशल अवेअरनेस वर काम करणारे डॉ. अक्षय फाटक, प्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार राहुल कळंबटे अशा अनेकांचा त्यामध्ये समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button