मुंब्रा येथील घटनेचा उल्लेख करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनावले खडे बोल. .
मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मांडली भूमिका,
रत्नागिरी:- ठाणे मुंब्रा येथे दोन दिवसांपूर्वी मराठी तरुणाला हिंदी भाषिकांकडून कडून झालेल्या दादागिरीचा धक्काबुकीचा उल्लेख करत शिवसेनेचे युवा नेते व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता आलेच पाहिजे मराठीचा अवमान आम्ही अजिबात सहन करणार नाही असा इशारा शिवसेना युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे कार्यक्रमात बोलताना दिला.
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद दापोली या दापोली येथील पत्रकारांच्या संघटनेकडून ना.योगेश कदम यांचा सन्मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते आज 6 जानेवारी रोजी सोमवारी बोलत होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ.स्वामीनाथन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पद्मश्री दादा इदाते दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य व उद्योजक अक्षय फाटक, राकेश कोटिया प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य सुनील दळवी, ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद रानडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्री योगेश कदम पुढे म्हणाले की, आपण सगळे भारताचे नागरिक आहोत याची आम्हाला जाणीव आहे पण महाराष्ट्रात राहताना आपल्याला मराठी बोलता आलेच पाहिजे आम्ही जबरदस्ती करत नाही पण तुम्ही प्रयत्न तर करा अशी भूमिका योगेश कदम यांनी मांडली आहे मराठीचा अवमान कराल तर खबरदार असाही इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरव गेला आहे असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केल. ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांनी एकोणिसाव्या शतकात तमाम मराठी बांधवांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम केले पहिलं मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं याचीच आठवण ठेऊन आज ‘पत्रकार दिवस’ साजरा करण्यात येतो.
दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमधून सुरू केले इतकी त्यांची मोठी दूरदृष्टी होती अशा शब्दात त्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला. यावेळी दापोली तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दापोली येथील पत्रकारांचा मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी, शेवटच्या व्यक्तीचा आवाज बनून पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे काम करावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त करत दापोली येथील पत्रकारांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केलं.
आपण शासनाच्या वतीने मंत्री म्हणून पत्रकारांसाठी जे काही शक्य ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. पद्मश्री दादा ईदाते यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या तीनही थोर मंडळींनी केलेलं कार्य त्यांचे राष्ट्रप्रेम व पत्रकारिता याबद्दल मार्गदर्शन केलं.
जयवंत जालगावकर यांनीही आपल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुदेश मालवणकर तर आभार प्रसाद रानडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिवसेनेचे तालुक्यातील नेते भगवान घाडगे सुधीर कालेकर किशोर देसाई सेनेच्या महिला आघाडी चारुता कामतेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या साधना बोत्रे, प्रीती जैन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मधुकर दळवी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार परिषद दापोली या संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेंद्र केळकर सचिव रुपेश वाईकर, प्रशांत कांबळे, सत्यवान दळवी, राजेश झगडे, अरविंद वानखेडे, जितेंद्र गावडे,आनंद करवरकर चेतन राणे, सलीम रखांगे महिला पत्रकार ज्योती बीवलकर आदी पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.