
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं बिहार ते तिबेट! 7.1 रिश्टर स्केल तीव्रता!!
साखरझोपेत असताना धरती हादरली आणि मोठं नुकसान झालं, बिहारपासून ते तिबेटपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमधील पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळ आणि तिबेटमध्येही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ आणि तिबेट इथे आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंप नेपाळच्या लोबुचेच्या उत्तर-उत्तर-पश्चिमेस 84 किलोमीटरवर आला, ज्याचा केंद्रबिंदू 10 किमीपर्यंत जमिनीखाली होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र नेपाळ असल्याचे बोलले जात आहे. अलीकडच्या काळात भारतासह अनेक देशांमध्ये भूकंपाच्या घटना सतत जाणवत आहेत. पृथ्वी सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेली आहे. या प्लेट्समध्ये कधीकधी संघर्ष किंवा घर्षण होते. त्यामुळेच आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवतात.