भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविली
रत्नागिरी, दि. 7 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तरी २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईनरीत्या नोंदणीकृत करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
१० वी नंतरच्या अभ्यासक्रमांना (११ वी, १२ वी) व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन २०२४- २५ साठी अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि. 26 डिसेंबर 2024 अन्वये या योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत देणे आवश्यक असल्याने मुदत दि. 15 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.000