
घरकुले, महिला बचत गटांच्या योजनांवर येणार संक्रांत
रत्नागिरी : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सध्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. याशिवाय उमेद योजनेतून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीच्या योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांवर आता संक्रांत आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेवरील योजनांच्या खर्चासाठी केंद्र शासनाकडून 60, तर राज्य शासनाकडून 40 टक्के निधी देण्यात येत होता. आता केंद्रशासनाने 60 टक्के निधी या विभागाला न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विभागाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य शासनानेच अखेर यासाठी पुढाकार घेत विभागाच्या खर्चाचा शंभर टक्के भार सोसत यासाठी चालू वर्षात 36 कोटी 72 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्य शासनाने या विभागातील प्रकल्प संचालक, सहायक प्रकल्प संचालक, सहायक लेखाधिकारी, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहायक, लिपिक अशा आठ पदांच्या वेतनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बळकटीसाठी आणखी काही उपाययोजना करण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र आदेश देण्यात येतील, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.
