
एन.सी.डी.सी च्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली – सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश शिंगारे मत्स्य महाविद्यालय येथे मच्छीमारांसाठीची कार्यशाळा
रत्नागिरी, दि. 7 :- मत्स्यशेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेवून आपल्या संस्थेचे बळकटीकरण व विस्तार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांनी केले.
लक्ष्मणराव इनामदार नॕशनल अकॅडमी फोर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन. सी.डी.सी. पुणे, सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आणि मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या परिषद दालन येथे मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेला प्र. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय डॉ प्रकाश शिंगारे, प्रोफेसर आणि हेड फिशरीज कॉलेज डॉ. नितीन सावंत, डॉक्टर केतन चौधरी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण उपस्थित होते.
मच्छीमार बांधवांनी कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजार पेठेतील उपब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन करायला हव्यात, अशी अपेक्षा श्री. शिंगारे यांनी व्यक्त केली.
केंद्राच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील मच्छीमार हा खोल समुद्रातील मासेमारी करण्यास १२ ते २०० समुद्र मैलांपर्यंत मासेमारीकरिता जाऊ शकतो अशी माहिती दिली. ड्रोनचा आधार घेऊन बेकायदेशीर मासेमारी टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मत्स्य शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन श्री.पालव यांनी केले.मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे, या संदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणा दरम्यान मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरीकरणामध्ये गणेश गायकवाड यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.उपनिर्देशक, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, पुणे गणेश गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करुन आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य, सहकारी संघाचे विशाल बेटकर यांनी विविध योजनांबाबत उपस्थित मच्छीमार संस्थांना मार्गदर्शन केले. आशिष शिरसाट यांनी आभार व्यक्त केले. या एक दिवसीय कार्यशाळेला विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षाणाचीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हयातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.