एच.एम.पी.व्ही.बाबत चिंता नको सूचनांचे पालन करा – जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
रत्नागिरी, :- चीनमधधून आलेल्या नवीन विषाणू (एच.एम.पी.व्ही.) बाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भितीचे वातावरण पसरु नये व सर्व नागरिकांनी खालील सूचनांप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले आहे.
सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (एच.एम.पी.व्ही.) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एच.एम.पी.व्ही.) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. भारतातदेखील या विषाणूचे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.
त्याअनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांमध्ये या आजाराबाबत भितीचे वातावरण निर्माण होऊ नये व विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक झाली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद तुषार बाबर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून लांब रहा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल, याची दक्षता घ्या. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. हस्तांदोलन, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे या गोष्टी करु नयेत.