
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे पत्रकार श्रीमती शोभना कांबळे यांचा महिला दर्पण पुरस्काराने सन्मान
रत्नागिरी :* महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या जन्म गावी संपन्न झालेल्या मराठी पत्रकार दिन कार्यक्रमात रत्नागिरी येथील पत्रकार श्रीमती शोभना कांबळे यांचा राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रत्नागिरी येथील जेष्ठ पत्रकार श्री. राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष श्री. रवींद्र बेडकीहाळ आणि राज्यभरातून आलेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते श्रीमती कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष श्री. रवींद्र बेडकीहाळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र तीन खंडात लिहिले असून त्याचे प्रकाशन लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच आचार्यांच्या पोंभुर्ले या जन्मगावी पत्रकारिता प्रशिक्षण महाविद्यालय सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या या संकल्पपूर्तीसाठी रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजाभाऊ लिमये आणि कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकारांनी सहकार्याचे आश्वासन दिले. बाळशास्त्रींच्या या जन्मगावी पत्रकारांसाठी चार-पाच दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्यांचे पत्रकार सृष्टीतील कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविले जावे, अशी सूचना यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी केली.