महापालिका लवकरच उभारणार सागरी किनारा मार्गालगत चार मजली पार्किंग!
मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गालगत लवकरच चार मजली पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी दुमजली पार्किंग सुविधा नियोजित होती. मात्र आता चार मजली पार्किंग सुविधा होणार असून ‘बेस्ट’च्या गाड्यांनाही या ठिकाणी पार्किंग दिले जाणार आहे. एल अॅण्ड टी कंपनीकडून यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला नवीन आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक असा एकूण 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या कोस्टल रोडमुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत होणार असून वेळेची 70 टक्के तर इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे. या प्रकल्पात 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी महापालिका उद्यान, वॉकिंग मार्ग, पार्किंग अशा सुविधा तयार करणार आहे. प्रस्तावित रेसकोर्समधील सेंट्रल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या बसगाड्यांचे पार्किंगही हाजी अली पार्किंगमध्ये करण्याचे नियोजन असल्याने आराखड्यात बदल करण्यात आला आहे. मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू होणार आहे. यामध्ये हाजी अली येथील रजनी पटेल चौक येथे होणाऱ्या पार्किंगलगत बेस्ट बससाठी थांबाही दिला जाणार आहे.
त्यामुळे हाजी अली दर्गा तसेच रेसकोर्समधील सेंट्रल पार्कमध्ये किंवा कोस्टल रोडजवळील नजारा पाहण्यासाठी येणाऱ्या मुंबईकर-पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.कोस्टल रोड प्रकल्पात हाजी अलीच्या रजनी पटेल चौक येथे दुमजली भूमिगत पार्किंग, वरळीजवळ दोन वेगवेगळे भूमिगत पार्किंग आणि अमरसन्स येथे पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तर वरळीमध्ये दोन ठिकाणी पार्किंगचे काम सुरू झाले आहे. हाजी अली येथील पार्किंगच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
हाजी अली येथे चारचाकी वाहनांसाठी दुमजली भूमिगत पार्किंगचा आराखडाही तयार करण्यात आला होता. या कामाला 2022 मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे हे काम रखडले होते, आता या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.