
दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे निधन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी पोलिस मुख्यालयासमोरील कोको हॉटेल पुढील वळणावर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार श्रीकृष्ण सावंत (वय 30, रा.ओरोस खुर्द-डोंगरेवाडी) याचा गोवा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या श्रीकृष्ण सावंत याची अंगावरील हळद उतरण्याआधीच झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे ओरोस पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवार 3 जानेवारी रोजी स. 8.50 वा. सुमारास सिंधुदुर्गनगरी पोलिस मुख्यालयासमोरील कोको हॉटेल पुढील वळणावर त्याच्या मोटारसायकलला समोरून येणार्या कारने धडक दिली होती. त्यात श्रीकृष्ण सावंत रस्त्यावर आदळल्याने त्याच्याडोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी श्रीकृष्ण सावंत याच्यावर प्रथम जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबोळी- गोवा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी उशिरा त्यांचे निधन झाले.