महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्कार श्रीमती शोभना कांबळे यांना जाहीर
6 जानेवारीला पोंभुर्ले येथे पुरस्काराचे वितरण
रत्नागिरी : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्काराच्या मानकरी रत्नागिरी येथील लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक श्रीमती शोभना देवराम कांबळे या ठरल्या आहेत. दिनांक 6 जानेवारी 2025 रोज मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या जन्मगावी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात श्रीमती शोभना कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे, माजी मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, लोकमतचे ज्येष्ठ समूह संपादक श्री. विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार श्री. राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष श्री. रवींद्र बेडकीहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात श्रीमती शोभना कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. श्रीमती शोभना कांबळे या गेली पंचवीस वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून 19 वर्षे लोकमत दैनिकाच्या रत्नागिरी आवृत्तीत कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची वरिष्ठ उपसंपादक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात केलेल्या कार्याचा यथोचित गौरव राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्काराने मराठी पत्रकार दिनी केला जात आहे.