
महाबळेश्वरला सहलीला आलेल्या जालन्याच्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.
महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या जालन्यातील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये 10 विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात वातावारण आल्हाददायक असल्याने शाळा आणि महाविद्यालयाच्या सहलींचे आयोजन या कालवाधीत करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक शाळा सहलींसाठी महाबळेश्वर, रायगडसह कोकणाला पसंती देतात. रायगड किल्ला, चवदार तळे, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक दाखविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणले जाते.
न्यू हायस्कूल वरुळ, घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहलदेखील सिद्धटेक बारामती मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे येत असताना बसमधील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी शीतपेय तसेच तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला, असे शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तीके यांनी सांगितले. त्यातच, महाबळेश्वर ते पोलादपूर या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गार वाऱ्यामुळे खिडक्या बंद केल्याने त्यांचा श्वास कोंडला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी 9 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले