
आनंदाची बातमी! एसटीचा उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचा निर्णय
एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत चालक-वाहकांसाठी जानेवारी महिन्यातील कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.चालक-वाहकांनी आणलेल्या वाढीव उत्पन्नावर त्यांना कमिशन दिले जाईल, अशी माहिती महामंडळाने दिली आहे.या योजनेत प्रत्येक क्रू ड्युटीचे निव्वळ वाहतूक उत्पन्न जानेवारीच्या उत्पन्नावर आधारित उद्दिष्ट ठरवले जाईल.
चालक-वाहक यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केल्यावर त्यापेक्षा जास्त उत्पन्न आणले, तर त्या वाढीव उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्त्या म्हणून तात्काळ रोखीने चालक-वाहकांना समप्रमाणात दिली जाईल.यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी चालक-वाहक अधिक मेहनत करतील, असा एसटी महामंडळाला विश्वास आहे. बुधवारी (1 जानेवारी) पासून प्रायोगिक तत्त्वांवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक चालक-वाहकांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन भत्ता मिळवावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी चालक-वाहकांना केले आहे.




