अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत….
दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित नाट्य महोत्सव सादर होत आहे. मोटली प्रॉडक्शन्स निर्मित दोन दर्जेदार नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. दिनांक ३ रोजी एक दास्तान एक हकीकत हे नाटक होईल. यात अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांची प्रमुख भूमिका आहे.
दोन्ही दिग्गज कलाकार रत्नागिरीत पहिल्यांदाच सादरीकरण करत आहेत. विविध विषयांवरील चित्रपट करत नसिरुद्दिन शहा यांची अभिनय कारकीर्द बहरलेली राहिली आहे. तर अनवट वाटेच्या नाटके, सिनेमातील चरित्र भूमिका यासोबतच साराभाई व्हर्सेस साराभाई या टिव्ही मालिकेमुळे रत्ना पाठक प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचल्या आहेत. दोन अत्यंत सशक्त कलाकारांना रंगमंचावर पाहणं हा एक जबरदस्त नाट्यानुभव असणार आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एन एस डी च्या तालमीतून तावून सुलाखून निघालेले हे दोन तगडे कलाकार या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना रंगमंचावर पाहता येणार आहेत. उत्तमाचा ध्यास घेऊन आयुष्यभर सकस आणि सार्थ काम करत मोटली प्रॉडक्शन्सच्या छताखाली आजवर अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली आहे. याच निर्मितीतील आणखी एक विचार करायला लावणारं आणखी एक नाटक ‘औरत औरत औरत’ दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
याचे दिग्दर्शक खुद्द नसीरुद्दीन शाह असून हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवरील कसदार अभिनेत्री सीमा पाहावा, भावना पाणि , त्रिशला पटेल, श्रुती व्यास, प्रेरणा चावला, जया विराली यात काम करत आहेत.या नाटकांच्या दोन आणि महोत्सवाच्या तीन अशा पाचही तारखा आपल्या डायरी मध्ये अवश्य नोंदवून ठेवा जेणेकरून संगीत महोत्सव आणि खूप वर्षांनी होणारे हिंदी नाटकांचे प्रयोग सभासद, तसेच तिकीट काढून येणारे रसिक यांना चुकणार नाहीत.आर्ट सर्कलच्या वार्षिक सभासदाना ही नाटके त्यांच्या कार्ड वर पाहता येतील.
आपल्या जागा त्यांनी ३१ जानेवारी पर्यंत राखीव करून ठेवाव्यात. ज्यांनी सभासदत्व घेतले नाही रसिकांकरिता नाटकाच्या प्रवेशिका १ फेब्रुवारी नंतर उपलब्ध होतील. या संदर्भात अधिक माहितीसाठी आर्ट सर्कलशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.