
हवेत फुगे सोडून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महोत्सवामधून चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार
रत्नागिरी, दि. ३ : मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा बौधिक, शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवासारखे महोत्सव उपयुक्त आहेत, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून आज छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे करण्यात आला. यावेळी बाल कल्याण समिती सदस्य ॲड रजनी सरदेसाई, ॲड प्रिया लोवलेकर, शिरीष दामले, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड विनया घाग, राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रुपेश पेडणेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर, लांजा संस्थेच्या संचालक मंगला नाईक आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. भविष्यातील सुदृढ आणि सक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. विद्यार्थ्यांनी अशा महोत्सवांमध्ये सहभागी व्हावे. त्यामधून जीवनात उज्ज्वल यश संपादन करावे.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, मन, मनगट आणि मेंदूचा विकास होण्यासाठी मैदानाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकांमध्ये लपलेल्या कलागुणांना बाहेर काढण्याची एकमेव जागा म्हणजे विविध महोत्सव होय. अशा महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण, क्रीडा कौशल्य आर्वजून सादर करावीत. त्यामध्येच भविष्यातील बीजे रोवलेली असतात. प्रास्ताविकेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. हावळे म्हणाले, जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुर्नवसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांमध्ये बंधुभाव, सांघिक भावना व नेतृत्व गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये ५०० मुला मुलींनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, खो खो , कबड्डी अशा क्रीडा प्रकाराबरोबरचे निबंध, चित्रकला, सामुहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धाही होणार आहेत.
रोटरी क्लबच्यावतीने यावेळी ४० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अनिल माळी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, चाचा नेहरु आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आली. जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अतिश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॕड योगेंद्र सातपुते यांनी केले.*