प्राण्यांसाठी निमसुलाइड औषध वापरण्यावर देशात बंदी; केंद्र सरकारचा गिधाडांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

मुंबई : वन्य प्राण्यांना वेदना कमी करण्यासाठी देण्यात येत असलेले निमसुलाइड हे औषध गिधाडांसाठी जीवघेणे ठरत असून केंद्र सरकारने देशात या औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. गिधाडांच्या संवर्धनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.*पशुवैद्यक प्राण्यांवर उपचार करताना त्यांना वेदनाशामक म्हणून निमसुलाइड हे औषध देतात.

मात्र याऔषधामुळे मृत्यू झालेल्या प्राण्याचे भक्षण करणाऱ्या गिधाडांस ते जीवघेणे ठरते. त्यामुळे भारतीय औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (डीटीएबीआय) गिधाडांसाठी जीवघेणे ठरत असलेल्या या निमसुलाइड औषधावर राष्ट्रीय बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे केली होती. प्राण्यांच्या वेदना कमी होण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या निमसुलाइडमुळे भारतात गिधाडांचा मृत्यू होत असल्याचे काही वर्षांपूर्वी इंटरनॅशनल सायंटिफिक जर्नल, एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड पोल्युशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

त्याचप्रमाणे नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतील गिधाडांवर यांसदर्भात केलेल्या प्रायोगिक चाचणीमध्ये या औषधाचे दुष्परिणाम दिसून आले होते. त्यामुळे भारतीय आरोग्य मंत्रालय आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) यांनी निमसुलाइडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ९० च्या दशकात भारतातील ९९ टक्के गिधाडांच्या मृत्यूस डिक्लोफेनाक हे औषध कारणीभूत ठरले होते. त्यानंतर ॲसेक्लोफेनाक आणि किटोप्रोफेन ही औषधे गिधाडांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे आढळले होते. त्यामुळे केंद्र सरकारने डायक्लोफेनाकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

तर अन्य दोन औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. निमसुलाइड हे औषध डायक्लोफेनाकप्रमाणेच गिधाडांसाठी घातक ठरत आहे. निमसुलाइडचा पशुवैद्यकीय औषधांमध्ये वापर सुरू राहिल्यास भारतातील गिधाडांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने निमसुलाइडवर बंदी घालावी, अशी शिफारस करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button