आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर!

कोरेगाव भिमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात ‘जय भीम-जय भीम’ चा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या नियोजनामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार सुनेत्रा पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, संजय बनसोडे, नितीन राऊत, राजकुमार बडोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लीकन पिपल पार्टि जोगेंद्र कावडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, यांसह अनेक आदींनी सदर ठिकाणी अभिवादन केले.राज्यभरासह उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , गुजरात , तेलंगना, हरियाना , कर्नाटकसह यावर्षी परदेशातुनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता.

या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातुन केले जात होते. भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना, आरपीआय, भारतीय बौध्द महासभा, दलीत पँथर, यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात येत असताना आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गित याठिकाणी साजरी केली जात होती. या सोबतच मराठवाडा, विदर्भातुन आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसून प्रभोधनात्मक गाणी सादर करत होते.

कोरेगाव भीमा येथे मंगळवार रात्रीपासून सुरु असलेला गर्दीचा ओघ बुधवारी पहाटेपासूनच वाढायला सुरुवात झाली होती. अंदाजे १४ ते १५ लाख लोक अभिवादनासाठी याठिकाणी आले होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ६३० बस सोडल्याने विजयस्तंभास मानवंदना येथे येणा-या नागरिकांची सोय झाली.

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजीमेंटची स्थापना करण्याची मागणी स्तंभावरुनच केली होती. या घटनेच्या कृतज्ञता म्हणूण दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजीमेंटच्या निवृत्त जवानांच्यावतीने मानवंदना देण्यात येत असते. यावर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत दिलेली मानवंदना विशेष आकर्षण ठरले.

कोरेगाव भीमा व विजयस्तंभाजवळ पोलीस नियंत्रण कक्ष उभारल्यामुळे गर्दित हरवले-सापडले यासाठी चांगला उपयोग होत होता.अनेक लहान मुले , मोबाईल , पाकिट सापडलेली या कक्षात पोलीस ज्यांचे आहेत त्यांना देत होती. तसेच समता सैनिक दलाचे २ हजार जवान देखील पोलीसांना मदत करत असतानाच पोलीसांच्या मदतीला असलेले शांतीदुत देखील गर्दिला दिशादर्शक व मदत करण्यास उपयोगी पडत होते.

कोरेगाव भीमा येथिल पुणे-नगर महामार्गावरील दुतर्फा असलेल्या पुलावर मोठी गर्दि झाल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले असुन ते सतत भीमा नदीपात्रातून आपल्या पाणीबुडीतुन लक्ष ठेवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button