
रत्नागिरी तालुक्यातील 37 गावांची तहान भागवणार्या. प्रादेशिक पाणी योजनेचे काम वर्षभरात पूर्ण होणार.
रत्नागिरी तालुक्यातील 37 गावांची तहान भागवणार्या मिर्या, शिरगाव, निवळी तिठा यांसह अन्य 34 गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात या योजनेचे पूर्ण काम होऊन ग्रामस्थांना घरात नळाद्वारे पाणी मिळणार आहे.याचा थेट लाभ 76205 ग्रामस्थांना होणार असून एमआयडीसीचा पाणीपुरवठ्याचा भार कमी होणार आहे. तब्बल 135.72 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली योजनेचे काम सुरू आहे.
रत्नागिरी शहरानजिकच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी विद्यमान उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मिर्या, शिरगाव, निवळी तिठा या प्रादेशिक नळपाणी योजनेसाठी बावनदीवर वळके मराठवाडी येथे कोल्हापुर टाईप बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे तर दुसरा बंधारा साठरे बांबर येथे उभारण्यात येणार आहे. 127 मीटर लांबीचा व चार मीटर उंचीचा हा बंधारा असून येथील विहिरीतून पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर उंच व बैठ्या 34 पाणी साठवण टाक्या व 7 सिंटेक्स टाक्या बसविण्यात येणार आहेत.